इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये माजी सैनिकांची जनजागृती
रेडा – इंदापूर पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने तसेच बिजवडी येथील बालाजी कला, क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान व हिंगणगाव येथील शिवसृष्टी कला, क्रीडा व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने इंदापूर पोलीस ठाणे आवारात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 100 वाहनचालक व वाचकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
यानिमित्त पोलीस ठाणे आवारात सेवानिवृत्त सैनिक विलासराव गाढवे, पत्रकार धनंजय कळमकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदेश शहा यांनी आयोजित केलेल्या शंभराव्या रस्ता सुरक्षा अभियान पोस्टर प्रदर्शनाचा लाभ 300 हून जास्त वाहनचालक, विद्या प्रतिष्ठान संचलित इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. दोन्ही संस्थेच्या माध्यमातून 15 वर्षांपासून रस्ता सुरक्षासंबंधी पोस्टर्स प्रदर्शन अनेक शाळा, विद्यालये महाविद्यालयात जाऊन गाढवे व कळमकर हे मोफत जनजागृती करतात.
कार्यक्रमाचा प्रारंभ इंदापूर पंचायतीच्या सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मधुकर पवार होते. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्यकारिणी सदस्य महेंद्र रेडके, सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कालठण नंबर 1 चे माजी सरपंच बाळासाहेब जगताप, शुभांगी खंडागळे, बापू झगडे उपस्थित होते.
यावेळी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. उदय कुरुडकर, महामार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे यांनी मार्गदर्शन केले.