42 देशांतून एकाचवेळी कोट्यवधी मराठी भाषिक एकत्र येणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तब्बल 42 देशांतून एकाचवेळी कोट्यवधी मराठी भाषिक एकत्र येणार आहेत. 25 मे रोजी विविध ठिकाणांहून मराठी भाषिक “महाजागर’ करणार आहेत, अशी माहिती विश्व मराठी परिषदेच्या वतीने देण्यात आली.
लाखो नागरिक संदेश शेअर करणार असून, त्यापुढील 72 तासांत तो जगभर पाठवण्यात येणार आहे. परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमाचे नेतृत्व “बृह्न महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिके’च्या अध्यक्षा विद्या जोशी करणार असून, “बृह्न महाराष्ट्र मंडळ अधिवेशन (2021) शार्लेट अमेरिका’चे मुख्य संयोजक आणि “गर्जा मराठी’चे संस्थापक संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांसह महाराष्ट्र मंडळांचे आजीमाजी पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
मानसिक आरोग्य, जागृती, दस्तावेजीकरण, सृजनशील कल्पनांचा अविष्कार आणि विश्व संवाद असे या उपक्रमाचे अपेक्षित फलित आहे, असे परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले. सहभागी होण्यासाठी संकेतस्थळावर संपर्क साधावा. “विश्व मराठी वाणी’ या युट्युब चॅनेलवर हे पाहता येणार. यात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. क्षितिज पाटुकले आणि अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.