कोरेगाव भीमा -येथे भीमा नदीच्या पुलावरून एका महिलेने लहान मुलीसह नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली. यात तिच्यासह साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. फायर ब्रिगेड व स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधण्यात आले.
सपना मधुकर कसबे (वय अंदाजे 25 वर्षे, रा. सणसवाडी, ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलीचे नाव समजू शकले नाही. शिक्रापूर पोलीस व पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीवरून कोरेगाव भीमा येथील नदीवरील पुलावरून सपना कसबे हिने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला आपल्या कमरेला ओढणीने बांधून आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.
या मायलेकींचे मृतदेह पाण्यात चार वाजल्यापासून स्थानिक तरुण व पुणे महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडचे जवान शोधत होते. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांना मृतदेह मिळाले. महिलेने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.