- आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन – करोनाबाधितांना
- फटाक्यांच्या धुराचा होऊ शकतो त्रास
पिंपरी – सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने दिवाळीत दिवे लावताना, फटाके वाजविताना दुर्घटना होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनो शक्यतो दिवाळीत सॅनिटायझरचा वापर टाळावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. यंदाची दिवाळी ही करोनासोबत असल्याने सॅनिटायझरमुळे पहिल्यांदाच असा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच फटाक्यांच्या धुरामुळे करोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो.
यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके वापरणे टाळावे. तसेच फटाके वाजवत असताना सॅनिटायजरचा वापर केला तर शरीर भाजण्याची शक्यता जास्त आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने ते तात्काळ पेट घेते. त्यामुळे या काळामध्ये शक्यतो सॅनिटायजरचा वापर टाळावा. तसेच करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
करोनाची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाबाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेने स्वतंत्र आदेश जारी केला आहे. महापालिकेची उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा.
रुग्णांवर थेट परिणाम होण्याची शक्यता
करोनाबाधित रूग्णांना त्रास होऊ नये यासाठी ध्वनी प्रदूषण न होणारे कमी आवाजाचे तसेच कमी धूर होणाऱ्या फटाक्यांचा वापर करावा. करोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे. सणामध्ये काही विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी.
दिवाळी पहाट कार्यक्रमांवर बंदी
दिवाळीच्या काळात नागरिकांनी करोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. दिवाळीपहाट सारखे कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण असलेल्या कार्यक्रमांना परवानगी नसेल. असे कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील. हा आदेश 10 नोव्हेंबर 2020 पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लागू राहतील, असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.