शिक्रापूर परिसरात खासगी सावकारकी जोमात

व्यावसायिक त्रस्त ः कारवाई करण्याची मागणी

शिक्रापूर (पुणे) – शिक्रापूरसह परिसरात अनेक ठिकाणी खासगी सावकारी सुरू आहे. तर काही सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये नागरिक, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच खासगी सावकार वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे या सावकारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिक्रापूर परिसरातील आजबाजूच्या काही गावांतील खासगी सावकारांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले असून काही खासगी सावकारांच्या तक्रारी थेट मंत्रालयात पोहचल्या आहेत. तर काही सावकारांनी नागरिकांच्या जमिनी नावावर करून घेतल्याचे प्रकार घडलेले आहेत. सध्या शिक्रापूर परिसरातील खासगी सावकार व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

व्यावसायिकाने खासगी सावकाराकडून काही रक्‍कम घेतलेली होती. त्या रकमेच्या व्याजापोटी तीनपट रक्‍कम खासगी सावकाराला दिली. तरीही सावकार व्यावसायिकास धमकी देत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील खासगी सावकारावर कारवाई करण्याची मागणी व्यवसायिकांमधून केली जात आहे.

शिक्रापूरातील खासगी सावकाराच्या प्रकाराबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल.
– राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.