घोडेगाव पंचायत समितीवर दिव्यांग बांधवांचा मोर्चा ः बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मकता
मंचर- घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढून विविध व्यथा मांडल्या. तसेच दिव्यांगांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनास दोन तास टाळा लाऊन सोमवारी (दि. 13) आंदोलन केले. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना लेखी माहिती देऊन त्यांच्या बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविली.
दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे विविध मागण्या लेखी स्वरुपात केल्या होत्या. परंतू त्याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्याने दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. ग्रामपंचायतीने बांधलेले बाजार गाळे दिव्यांगांना राखीव ठेवण्याबाबत आंदोलने केली. परंतू प्रशासन जागे झाले नाही.
पंचायत समिती कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी घोषणा देवून आंदोलन केले. तरीही दोन तास गटविकास अधिकारी भेटीला आले नाही. अखेर चर्चेला गटविकास अधिकारी आले.परंतू मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवत नसल्याने दुपारी 2 वाजता गटविकास अधिकारी यांच्या दालनाला दिव्यांगाच्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी टाळे ठोकण्यात आले.
दोन महिन्यात सर्व ग्रामपंचायतीची व्यवसाय गाळे असल्याबाबत माहिती मागवून दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के व्यवसाय गाळे आरक्षित ठेऊ. ज्या ग्रामपंचायती अपंग बांधवांकडे दुर्लक्ष करतील, अशा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग कक्ष तात्पुरत्या स्वरुपात सोमवार व शुक्रवार ठेवण्यात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर स्वतंत्र कक्ष देण्यात येईल, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिल्यानंतर दिव्यांग व्यक्तींनी समाधान व्यक्त करुन 4 वाजता टाळे उघडले.
गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्यासह अपंग हित विकास आणि पुर्नवसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे, प्रहार अपंग क्रांतीचे धर्मेंद्र सातव, समीर टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे, अपंग हित, जिल्हाध्यक्ष अनिल मेमाणे, कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, समर्थ दिव्यांग सेवा संस्थेचे सुनील दरेकर, पांडुरंग काळे, पूनम काळे, शोभा पिंगळे, शोभा यादव, शरद फलके, मुन्ना इनामदार, मंगल धोत्रे, दत्तात्रय लोखंडे, अविनाश लबडे आदी यावेळी उपस्थित होते.