मुंबई – ‘अवतार 2: द वे ऑफ वॉटर’ हा बहुचर्चित सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेमागृहात या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला कमवला आहे. आश्चर्यकारक स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राउंड स्कोअर मुळे सिनेमाने एक वेगळीच उंची गाठली आहे. हे सर्व पाहणे हा भारतीय प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असल्याचं पाहायला मिळत आहे.
समुद्र आणि त्यांच्यातील बोटीच्या निळ्या जगाची ओळख करून देणारा जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यात जगभरात 600 दशलक्ष किंवा सुमारे पाच हजार कोटींचा व्यवसाय सिनेमाने केला आहे. हा सिनेमा भारतात चांगला व्यवसाय करत आहे.
पहिल्या आठवड्यात या सिनेमाने एकूण 193.60 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या आठवड्यात हा भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. तर, ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमा अजूनही 260.40 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे. अॅव्हेंजर्स एंडगेमने पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात 260.40 कोटी कमावले आहेत.
दरम्यान, देशातील निवडक शहरांमध्ये 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता ‘अवतार 2’ चा पहिला शो सुरू झाला. सुमारे दोन हजार कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राऊंड स्कोअरचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतात, इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.