मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू इटलीचा यानिक सिन्नर याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला आहे. यासह नोव्हाक जोकोविच याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
🇮🇹 JANNIK SINNER HAS ADVANCED TO HIS FIRST MAJOR FINAL!
The 22-year-old takes out World No. 1 Novak Djokovic in four sets at the #AusOpen. pic.twitter.com/Vb43UO5vz5
— Tennis Channel (@TennisChannel) January 26, 2024
यासह 36 वर्षीय जोकोविचचे विक्रमी 11व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि 25वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. आता पुढील ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी त्याला फ्रेंच ओपनची वाट पाहावी लागणार आहे. सिन्नरने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जोकोविचचा 6-1, 6-2, 6-7, 6-3 असा पराभव केला. हा सामना 3 तास 22 मिनिटे चालला. 22 वर्षीय सिनर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
अंतिम फेरीत, सिन्नरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. ऑस्ट्रेलियन ओपनचे 10 विजेतेपद पटकावणारा जोकोविच आजच्या सामन्यात आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. सिन्नरने पहिले दोन सेट एकतर्फी जिंकले.
तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि टायब्रेकरमध्ये विजय मिळवला, मात्र चौथ्या सेटमध्ये सिन्नरने दमदार पुनरागमन करत सेट 6-3 असा जिंकला.सिन्नरचा हा विजय त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे.
जोकोविच याआधी जेव्हाही ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता तेव्हा त्याने विजय मिळवला आहे आणि चॅम्पियनही झाला आहे. मात्र, आता त्याच्या विक्रमात एका पराभवाचीही भर पडली आहे. जोकोविचने गेल्या सहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकही सामना गमावला नव्हता. 2018 मध्ये या स्पर्धेत त्याला शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी चौथ्या फेरीत त्याला दक्षिण कोरियाच्या चुंग ह्योनने पराभूत केले होते.
Mary Kom Retirement : “माझे विधान चुकीच्या पद्धतीने…” मेरी कोमकडून ‘त्या’ वृत्ताचे खंडन…
सिन्नरकडून पराभूत होण्यापूर्वी, जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 33-0 असा विजयी विक्रम होता. 22 वर्षे आणि 163 दिवस वय असलेला सिन्नर या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा सर्वात तरुण अंतिम फेरीचा खेळाडूही ठरला आहे. यासह त्याने 2008 मध्ये केलेला जोकोविचचा विक्रमही मोडला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सिनर हा पहिला इटालियन खेळाडू देखील ठरला आहे.