देशात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्णवाढ

अमेरिका, ब्राझीलपेक्षाही संख्या अधिक

नवी दिल्ली : जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हीच बाब चिंतेचा विषय ठरत आहे. कारण ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात करोनाचे 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल 926 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 6 दिवसांमध्ये देशात 3 लाख 28 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये 3 लाख 26 हजार 111 रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये 2 लाख 51 हजार 264 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं लाखांचा टप्पा पार केला.

करोनामुळे सुरूवातीच्या सहा दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 6 हजार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात 5 हजार 075 जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगण, ओदिशा, पंजाब आणि मणिपुरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येंची नोंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.