- मनसे गटनेत्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले
पिंपरी – सगळीकडेच करोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. करोना विषाणूपासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे ही महत्त्वाची ढाल आहे. मात्र त्याचे काटेकोर पालन नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधीही करत नसल्याचे आज दिसून आले. शहरातील नेहरुनगर येथील जम्बो रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. यावर पवार संतापले, त्यांनी थोड लांब राहून बोलण्याचा सज्जड दम भरला.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरामध्ये जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी नगरसेवक चिखले यांनी त्यांच्याशी शहरातील जिम सुरु करण्याबाबत जवळ जाऊन विचारले. त्यावर अजित पवार संतापत म्हणाले, “अरे बाबा पहिलेच आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहे. थोड लांबून बोल की, काही सोशल डिस्टन्सिंग आहे का नाही.’ असे सांगत त्यांच्यावर भडकले. दरम्यान याबाबत मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी बोलणे झाले नाही.