पिंपरी -आकर्षक फुलांची सजावट, टाकाऊ वस्तूंचा कलात्मक वापर करून केलेल्या कलाकृती फळ, फूल प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहेत. महापालिकेचा उद्यान विभागाच्या वतीने निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासस्थान जागेवर फुले, फळे, भाज्या, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (दि. 12) असणार आहे. या प्रदर्शनात शेकडो प्रकारची फुले, फळे, भाज्या आकर्षक पद्धतीने ठेवली आहेत. बागांचे नमुनेदेखील लावले आहेत.
या प्रदर्शनात फुलांच्या शेकडो जाती पहायला मिळत आहेत. तसेच फळे आणि फुलांचा कलात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ती लक्ष वेधून घेत आहे. टायरचा वापर करून रणगाडे बनविण्यात आले असून लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे. फुलांची सजावटीतून भारतमातेचे चित्र व त्यातून दाखविण्यात आलेली एकात्मता, नारळाच्या करवंटीचा वापर करून सादर केलेली कलाकृती, लाकडांचा वापर करून सजवलेली बाग मुख्य आकर्षण ठरत आहे. तसेच या प्रदर्शनात नागरिकांच्या मनोरंजनासाठी विशेष लाइव्ह बॅंड, विदुषकाचे प्रयोग, लाइव्ह पेंटिंगचे सादरीकरण मुख्य आकर्षण आहे. तसेच वेगवगळ्या प्रकारची फुले, फळे, झाडांची रोपे खरेदी व विक्रीसाठी ठेवण्यात आली असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात लाकडांचा वापर करून माणसांच्या प्रतिकृती, सायकल, फुलपाखरू लक्षवेधी ठरत आहेत. लाकडांचा वापर करून त्यावर सुंदर रित्या गवताची मांडणी करून साकारलेली वसुंधरा
दिसत आहे.
फुलांचा दरवळला गंध
शेकडो फुले आणि पानांचा वापर आकर्षक पद्धतीने केला आहे. गुलाबासह इतर शोभिवंत फुलांनी जणू गंध दरवळ्याचे आत प्रवेश करताच जाणवते. येथे अनेक प्रकारची आणि जातीची फुले पहायला मिळत आहेत.
फळांचा वापर देखणा
गाजर, कलिंगड, भोपळा यांचा वापर आणि रचना पहाण्यासारख्या आहेत. भोपळ्यापासून बनविलेले विमान, गाजरापासून बनविलेले तंतूवाद्यासारख्या कलाककृती लक्ष वेधून घेत असून फळे, फुलांचा देखण्या पद्धतीने वापर केला आहे.