नवी दिल्ली -ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. ज्या फार्महाऊसवर सतीश कौशिक थांबले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता आक्षेपार्ह औषधे सापडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची पोलिसांनी लिस्ट तयार केली असून, त्यातील एक उद्योजक सध्या फरारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्महाऊसवर जाऊन तपासणी केली असता, पोलिसांना काही “आक्षेपार्ह औषधे’ सापडली. यानंतर पोलीस सतीश कौशिक यांच्या सविस्तर पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादीही तयार केली आहे, त्यावेळी सतीश कौशिक यांच्यासोबत जे लोक फार्महाऊसमध्ये होते, त्या सर्वांची यादी तयार केली आहे. सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरारी झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.
दरम्यान, सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुधवारी रात्री उशिरा त्यांना चक्कर आल्याने गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.