पुणे – “गावात येऊन वकिलीची कामे करायची नाहीत. तसेच, सल्ला द्यायचा नाही’ अशी धमकी देत वकिलाला मारहाण केल्याप्रकरणात चौघांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी फेटाळला.
जालिंदर मल्हारी शिर्के पापळ (वय 52), अनिकेत जालिंदर शिर्के पापळ (वय 30), अजित उर्फ आप्पा कोंडीराम शिर्के (वय 37), अनिल कोंडीराम शिर्के पापळ (वय 42, सर्वजण रा. मांढर, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी चौघांची नावे आहेत. याप्रकरणी विजयसिंह निलकंठराव राजेशिर्के (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना 31 मे रोजी रात्री अकराच्या सुमारास मांढर गावात घडली. राजेशिर्के हे शेतीच्या कामासाठी त्यांच्या कामगाराला घेण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. यावेळी, चौघांनी अडवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांपैकी एकाने धारदार शस्त्राने वार केला. तर एकाने गळा दाबून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. तसेच, “मांढरला येऊन वकिलीची कामे करायची नाहीत. कोणाला सल्ला द्यायचा नाही. मांढरमध्ये परत पाय ठेवायचा नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी चौघांनी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. “हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून, आरोपी अटक नसल्याने उर्वरित तपास बाकी आहे. आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास ते फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणून, धमकी देऊन तपासामध्ये अडथळा आणू शकतात. वकिलांवर होणारे हल्ले वाढले आहेत. जामीन मंजूर केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असा युक्तिवाद ऍड. बोंबटकर यांनी केला.