रेरा प्रॅक़्टीशनर्स असोसिएशनची अध्यक्ष आणि सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी
पुणे – आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दाखल करण्यात येणारी दरखास्त व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन द्यावी, अशी मागणी रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष अॅड. निलेश बोराटे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक दिवस महारेराचे कामकाज बंद होते.त्या काळात महत्त्वाच्या दाव्याची ऑनलाईन सुनावणी सुरू होती. दरम्यान, महारेराची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन सुनावणी सुरू झाली आहे. या निर्णयाचे रेरा प्रॅक्टीशर्स असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, निकाल लागल्यानंतर दिलेल्या मुदतीत आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास दरखास्त दाखल करावी लागते.
दरखास्तीसाठी लागणारी कागदपत्रे, सुनावणी ऑनलाईन घ्यावी. प्रमाणित कागदपत्रे पोस्टाने घरी पाठवावीत. जर एखाद्याला अतिरिक्त कागपत्रे हवी असतील, तर त्याबाबतचे शुल्क ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून द्या. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणाऱ्या सुनावणीचे महारेराने सोयीसाठी रेकार्डिंग करून ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनातून केल्याचे ऍड. निलेश बोराटे यांनी सांगितले. या निवेदनावर अध्यक्ष अॅड. निलेश बोराटे आणि सचिव अॅड. रोहित माळी यांच्या सह्या आहेत.