संगमनेर -संगमनेरच्या कारागृहात कैदेत असलेल्या दरोडेखोराने मध्यरात्री कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कोठडीतील अन्य कैद्यांसह कर्तव्यावरील सुरक्षारक्षकाच्या सावधानतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. सध्या त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्य माहितीनुसार, हा प्रकार आज (दि.16) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनच्या कारागृहातील पहिल्या क्रमांकाच्या कोठडीत घडला. या कोठडीत संगमनेरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील दोघांसह अन्य 20 आरोपी कैद आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारा सोनसाखळी चोर योगेश सीताराम पाटेकर (वय 20) हा गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात आहे.
आज मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कोठडीतील अन्य कैदी झोपी गेल्याचे पाहून तो कोठडीतील शौचालयाजवळ गेला व त्याने कोणत्यातरी टोकदार वस्तूने स्वतःच्या मानेवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अन्य कैद्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला रोखण्यासह सुरक्षेवरील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ याबाबत वरीष्ठांना कळवून कोठडीची दारे उघडली. त्यानंतर जखमी झालेल्या सोनसाखळी चोराला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.