सोलापूर: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करून त्याला जाळण्याचा प्रयत्न काल झाला. त्यात हा कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणातील आरोपी अरूण जाधव याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार या जिल्ह्यातल्या माळशीरस तालुक्यातील मळोली गावात मंगळवारी रात्री घडला.
जाधव याच्या भावाचे हॉटेल या कॉन्स्टेबलने तपासल्यामुळे जाधवला त्याचा राग आला होता त्यातून त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने पोलीस कॉन्स्टेबलच्या हातातील फोन काढून फेकून दिला आणि नंतर त्याने त्याच्यावर ब्लेडने वार केले. नंतर त्याने आपल्याजवळील बाटलीतील पेट्रोल त्याच्या अंगावर टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी गावच्या पोलीस पाटलांनी मध्यस्थी करीत जाधवला रोखून धरले. हा कॉन्स्टेबल वेळापुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार जाधवला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.