सेऊल – दक्षिण कोरियातील एका बांधकामाच्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 36 जणांचा मृत्यू झाला. राजधानी सेऊलजवळच इचीओन इथे ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका गोदामाचे बांधकाम सुरू असताना या ठिकाणी ही आग लागली होती. या गोदामामध्ये आणखी कामगार अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुपारच्या सुमारास ही आग लागली आणि अग्निशामक दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांना अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्यांपैकी 25 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे आणि घटनास्थळी आणखी 11 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत, असे इचीओन येथील अग्निशामक दलाचे अधिकारी पार्क सू-जोंग यांनी सांगितले.
जखमी झालेल्या इतर दहा जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमार 30 कामगार स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झाले. पण किमान चार जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण अधिकारी शोधत आहेत. भूमिगत काम सुरू असताना घडवून आणलेल्या स्फोटामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. बचाव आणि मदतीसाठी सर्व शक्य ते प्रयत्न करण्याच्या सूचना दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई इन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.