विश्रांतवाडी – धानोरी रस्ता परिसरात महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात येत असताना जमावाने जोरदार हल्ला चढवत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोन मुख्य आरोपींसह 20 ते 25 जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवा परांडे (वय 55) व मंगेश साळुंखे (वय 35) या दोन मुख्य आरोपींसह इतर 20 ते 25 जणांविरोधात (सर्वजण रा. धानोरी) गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिका बांधकाम विभागाचे निरीक्षक प्रकाश महादेव कुंभार (वय 48, रा. वडगाव बु.) यांनी फिर्याद दिली आहे. यावेळी जमावाकडून पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी व जेसीबी चालक सुभाष कांबळे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे.
धानोरी-लोहगाव मुख्य रस्त्यावर मंगळवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई पथक धानोरी गावठाण परिसरात पोहचले असता एका पत्राशेडवर कारवाई करताना स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत जोरदार वादावादी सुरू केली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. जेसीबी चालक सुभाष कांबळे याला शिवीगाळ करून मारहाण केली. तेथे उपस्थित असलेले अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. जमाव मोठ्या प्रमाणात असल्याने पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून. नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला.
दरम्यान, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पालिका पथकातील खाकी वर्दीतील सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी जमावाच्या निदर्शनास पडले. त्यामुळे जमावाने या कर्मचाऱ्यांकडे धाव घेत अक्षरशः त्यांचा पाठलाग केला. यावेळी या घटनेचे चित्रण करणाऱ्या दोन-तीन व्यक्तींचे मोबाइल हिसकावून घेत जमावातील व्यक्तींनी फोडले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.
महापालिकेचे पोलीस पथक जेवायला…
या कारवाईसाठी पालिकेच्या पथकाला पालिकेच्या पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. मात्र, जमावाकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण होत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी जेवायला गेले होते. सर्व घटना घडून गेल्यानंतर पालिकेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी या प्रकरणी बोलण्यास थेट नकार दिला.
धानोरीत घडलेल्या घटनेच्या मुळापर्यंत जाणार आहे. इमारतीच्या साइड मार्जिन व फ्रंट मार्जिनमध्ये केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी नोटीस देण्याची आवश्यकता नाही. उद्यापासून (दि.30) महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचारी व यंत्रसामग्री तसेच मोठ्या फौजफाट्यासह धानोरी-येरवडा परिसरात कारवाई करणार आहे. – माधव जगताप, अतिक्रमण कारवाई विभाग प्रमुख, महापालिका
अतिक्रमण विभागाचे पोलीस, सुरक्षारक्षक असताना सुद्धा अधिकाऱ्यांना मारहाण होते. जेसीबी फोडण्यात आली. अशा वेळी सुरक्षा यंत्रणा काय काम करत होती? पोलीस चौकी समोर हा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांना गुंडागर्दी करण्यासाठी कुणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. अतिक्रमण कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असे वारंवार नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे याची दक्षता आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे.