पिंपरी – रहाटणी येथे लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम फोडले आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले असून मशीनमधून रक्कम चोरून नेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. एटीएम मध्ये रक्कम होती. चोरट्यांनी एटीएम फोडून रक्कम चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बँकेकडून एटीएममध्ये किती रक्कम होती, याचा आकडा अद्याप पोलिसांना सांगण्यात आला नाही.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी वाकड परिसरात एक एटीएम फोडल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये गॅस कटरने एटीएम फोडताना एटीएम जळाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडल्याचा प्रकार घडला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.