श्रीगोंदा -तालुक्यातील मढेवडगाव येथे एका खासगी कंपनीचे एटीएम चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने फोडून त्यातील 4 लाख 70 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान, काही रक्कम “मशिन’ मध्ये अडकल्याने ती वाचल्याची माहिती समजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मढेवडगाव येथे नगर-दौंड रस्त्यालगत एका खासगी कंपनीचे एटीएम आहे. आज (दि.10) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी कटावणी लावून या एटीएमचे शटर उचकटले. एटीएम “मशिन’ला जिलेटीन लावून स्फोट घडवून ते फोडण्यात आले. चोरट्यांनी या “एटीएम’मधील 4 लाख 70 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केली. यामध्ये चोरट्यांनी दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा चोरल्या. तरी काही नोटा मशीनमध्ये अडकल्याने ती रक्कम वाचली. याप्रकरणी केशव बुलाखे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
“एटीएम’मध्ये जिलेटीनच्या काही कांड्या सापडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांनी पाहणी केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक समीर अभंग यांनी भेट दिली. मढेवडगाव शिवारातील गोपाळ वाबळे यांच्याही घरी चोरी झाली. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेल्याची माहिती समजली.