कर्जत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या (शनिवार) कर्जतमध्ये शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हजारो कार्यकर्त्यांसह, तसेच कर्जत-जामखेडमधील इतर पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यासाठी शहरातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील प्रांगणात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नगरचे पालकमंत्रिपद सलग पाच वर्षे सांभाळणाऱ्या राम शिंदे यांना त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तीन वर्षांनंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन शिंदे यांचे पुनर्वसन केले होते. दरम्यान, उद्या होणाऱ्या कार्यक्रमात फडणवीस कर्जत-जामखेडला काय गिफ्ट देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपत प्रवेश करणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा धक्का मानला जात असून, भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे. तालुक्यात घुले यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर आ. प्रा. शिंदे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आ. शिंदे यांनी शहरातील रस्त्याची दुरुस्ती, स्वच्छता, धुळीचा प्रश्न आदी मुद्यांवर अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी प्रांताधिकारी गंगाराम तळपाडे, अंबादास पिसाळ, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक सतीश गावित, कैलास जमदाडे, सचिन पोटरे, डॉ. सुनील गावडे, गणेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.