जागांच्या चुकीच्या मूल्यांकनाची कबुली
पुणे, दि. 7 – मेट्रो प्रकल्पासाठी पालिकेकडून घेण्यात आलेल्या जागांचे मूल्यांकन 410 कोटी रु. असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी बैठकीत कबूल केले. तसेच हे मूल्यांकन गृहीत धरून पालिकेच्या हिश्श्यातून ही रक्कम वजा करण्यात येणार असल्याचेही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत पालिकेने दिलेल्या जागांचे मूल्यांकन मेट्रोने केवळ 157 कोटी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिकेने पत्र पाठवून तसेच नियमांचा आधार घेत हे मूल्यांकन चुकीचे असल्याचे मेट्रोला दाखवून दिले होते. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी मार्गांच्या कामासाठी सुमारे 951 कोटींचा निधी महापालिकेने टप्प्याने मेट्रोस उपलब्ध करून द्यावा, असे पत्र महामेट्रोने वारंवार दिले आहे. महामेट्रोने सप्टेंबरमध्येही असे पत्र पाठवत पालिकेने आतापर्यंत दिलेल्या जागांचे मूल्यांकन 157 कोटी असल्याचे कळवले. मात्र, हे मूल्यांकन पालिकेने पुन्हा तपासले. या वेळी मेट्रोने प्रकल्प 2015 मध्ये मंजूर झाल्याचे दाखवत त्या वर्षीच्या रेडीरेकनर दराने जागांचे मूल्य महापालिकेस न कळवताच निश्चित केले.
तसेच त्याच मूल्याच्या आधारे पालिकेच्या हिश्श्यातून हा 157 कोटींचा निधी वजा करत उर्वरित 794 कोटींचा निधी जागांच्या तसेच निधीच्या स्वरुपात उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात येताच, महापालिकेच्या भूसंपादन विभागाने यावर आक्षेप घेतला. 2008 च्या जागावाटप नियमानुसार जागा हस्तांतरित करताना अथवा भाडे कराराने देताना चालू रेडीरेकनरनुसारच दर असावा, अशी तरतूद आहे. तसेच जिल्हा प्रशासनानेही आपल्या जागा मेट्रोला देताना चालू वर्षाच्या रेडीरेकनर दराने महामेट्रोला दिल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यामुळे महापालिकेने महामेट्रोला हस्तांतरित केलेल्या जागांचे मूल्य हे तब्बल 410 कोटी असल्याचे महामेट्रोला कळविले होते.
शनिवारी महापालिकेत मेट्रोच्या जागांबाबत महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालिकेने पुन्हा या मूल्यांकनाचा विषय काढला, त्यावर मेट्रोकडून सुरूवातीला केंद्रशासन तसेच नागपूर मेट्रोसाठी शासनाने 1 रुपया दराने जागा दिल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिकेकडून आपली बाजू लावून धरल्याने अखेर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या मागणीला दुजोरा देत 410 कोटींची रक्कम पालिकेच्या हिश्श्यात दाखविली जाईल, असे सांगण्यात आले.
…तर शासनाकडून मान्यता घेऊन या
या बैठकीत जागांचे मूल्यांकन वाढवण्यासाठी पालिका आग्रही असल्याचे दिसताच मेट्रोच्या काही अधिकाऱ्यांनी मेट्रो हा महापालिकेचा प्रकल्प असून शहरासाठी आहे. तसेच नागपूर मेट्रोसाठी त्या महापालिकेने केवळ 1 रुपया दाराने जागा दिल्याचे सांगितले. मात्र, या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यासाठी असा काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मेट्रोने शासनाकडून तसा निर्णय मंजूर करून आणावा, त्यानंतर महापालिका त्याबाबत विचार करेल असे सांगितले.