जगमान्य पोशाख : सलवार-कमीज-दुपट्टा

हवा मै उडता जाये, मोरा लाल दुपट्टा मलमल का
जी मोरा लाल दुपट्टा मलमल का…
आता 70 वर्षं पूर्ण झालेलं हे गाणं ऐकायला “एव्हरग्रीन’ वाटत असलं तरी पण पडद्यावर हे गाणं पाहिलं की त्यातल्या बिमला कुमारीनं दुपट्ट्यासोबत जो ड्रेस घातलाय तो किती जुन्या फॅशनचा आहे असं वाटतं आणि आज आपण ज्याला सरसकट पंजाबी ड्रेस म्हणतो तो किती वेगळा आहे याची जाणीव होते. फक्त सत्तर वर्षांतच जर एका पोशाखामध्ये इतके बदल होत असतील तर या बदलांची आणि या पोशाखाची सुरुवात नेमकी कुठून झाली असावी?

खरंतर सलवार कमीज हे आपल्या इतक्‍या परिचयाचे आणि रोजच्या वापरातले आहेत की हे कपडे आपल्याकडे कसे आणि कुठून आले हे प्रश्न आपल्याला सहसा पडतच नाहीत. ही फार पुर्वीची गोष्ट नाही. आजकाल सगळ्याच वयाच्या बायका सलवार कुर्ता वापरतात;पण 30/40 वर्षांपूर्वी आपल्याकडे कॉलेजला जाणाऱ्या मुलींनाही पाचवारी साडीच नेसावी लागत होती. हे आजच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना सांगितलं तर आश्‍चर्यच वाटेल.

आपल्याकडे म्हणण्यापेक्षा खरंतर संपूर्ण दक्षिण आशियातच सलवार कमीज साधारणपणे तेराव्या शतकात मुघलांच्या बरोबर आली. सुरुवातीला सलावार कमीज फक्त मुस्लिम लोकच वापरायचे. फक्त स्त्रियाच नाहीतर पुरुषही सलवार कमीज वापरायचे. यामध्ये बायका फक्त डोक्‍यावरुन आणि खांद्यावरुन ओढणी घ्यायच्या इतकाच काय तो फरक होता.
अगदी सुरुवातीच्या काळात तुर्कस्तान, अरब, मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा लांब पांढऱ्या रंगाचा झगा वापरात होते. याला “अबा’ असं नाव होतं. त्यावर डोक्‍यावर आणि खांद्यावर चादर घेतली जायची. सगळीकडेच वाळू असलेल्या या प्रदेशात अशा पोशाखाची गरज होती.

समाजातल्या श्रीमंत घराण्यातल्या बायका रेशीम, लिनन, किंवा मलमलच्या कापडांचे सैल झगे वापरत होत्या. या बायका सलवारही वापरत होत्या. या सलवारींना मात्र कमरेपाशी ओवलेली नाडी असते तशीच नाडी पायापाशीही ओवलेली असायची त्यामुळे सलवार पायात चढवून घोट्यापाशी नाडी बांधून टाकली की सलवारला छान फुगे येत असत. हे फक्त फॅशनसाठी नव्हतं तर तिथे असणाऱ्या प्रचंड थंडी, वारा आणि ऊन अशा विषम हवामानासाठी हे गरजेचं असायचं.

पूर्वीचे हे सलवार कमीज अगदी साध्या पद्धतीनं शिवलेले असायचे. म्हणजे दोन चौरसाकृती कापडं एकमेकांवर ठेवून त्यांच्या खालच्या बाजूनं उलट्या “व्हि’ आकाराचा कपडा काढून टाकायचा आणि उरलेले दोन्ही कापडं कमरेकडचा भाग सोडून एकमेकांना शिवून टाकायचे! पण नंतर त्यात असंख्य प्रकार पडले.

सलवारबद्दल सांगायचं झालं तर साधी सलवारही वर सांगितलं तशी निर्माण झाली. त्यांनतर आपण बऱ्याच वेळा वापरतो ती अनेक चुण्यांची धोतरासारखी दिसणारी पतियाला सलवार खरोखरच पतियालामध्येच उगम पावली आहे. तिला कापडही 6 ते 10 वार लागायचं असं सांगितलं जातं. त्यानंतर खूपच प्रसिध्द असलेली चुडीदार प्रकारची सलवार जोधपूरच्या प्रताप सिंग या राजानं निर्माण केली. ती सलवार मुलतानी मातीनं धुतली जायची. त्यामुळे तिला मुलतानी मातीचा विशिष्ट पिवळट रंग यायचा.

आपण नेहमी वापरतो त्या कमीजमध्ये पण असंख्य प्रकार आहेत.कश्‍मीरमध्ये वापरतात त्याला बशर्टासारख्या मलमलच्या किंवा लोकरीच्या कमीजला फेरन म्हणतात. तर सिंधी बायका पूर्वी सलवारच्या वरती घालायच्या त्या कमी उंचीच्या कमीजला चोलो असं म्हणत असत. तर त्यांच्या सलवारला कांचा म्हणत असत. याशिवाय या प्रत्येक प्रकारासोबत ओडणी किंवा दुपट्टा प्राचीन काळापासून आहेच.आता सगळ्याच बायका ओढणीशिवाय वापरत असलेल्या लेगिंग्स आणि कुर्त्याला याच पोशाखाचं अत्याधुनिक रुपच म्हणावं लागेल.

इतकं सगळं सांगून झाल्यानंतर अनारकली हेच नाव असणाऱ्या कमीज बद्दल काय बोलणार? मुघल दरबारातल्या खुद्द अनारकलीनंच हा प्रकार निर्माण केला आहे! आणि कृष्णधवल सिनेमा असणाऱ्या काळात “प्यार किया तो डरना क्‍या’ हे एकमेव रंगीत गाणं म्हणत मधूबालानं हा प्रकार अजरामर केलाय!

अमृता देशपांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)