महापालिकेच्या 30 शाळांना मैदानच नाहीत : तर खासगी शाळा गल्ली-बोळांमध्ये
पिंपरी (प्रतिनिधी) – सध्या सर्व शाळांमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु आहेत. केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. परंतु शहरातील अनेक खासगी शाळा गल्ली-बोळांमध्ये उघडण्यात आल्या आहेत, तर महापालिकेच्या 30 शाळांना खेळाची मैदानेच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे. मात्र खेळण्यासाठी मैदानच नसल्याने महापालिकेच्या शाळेतून चांगले खेळाडू घडण्यासाठी अडथळा होत आहे.
अनेक शाळा भौतिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. अनेक शाळांना संरक्षक भिंत नाही. मैदाने नसल्याने विद्यार्थ्यांची खेळण्यासाठी कुंचबणा होत आहे. केंद्र सरकारकडून खेळासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्याचबरोबर मिशन ऑलिम्पिक 2024 साठी काही महिन्यांपूर्वीच 750 मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये एवढा खर्च करण्यात येतो. एवढा खर्च शासन खेळाडूंवर करीत असताना आपल्या शहरातील प्राथमिक शाळेत खेळासाठी क्रीडांगणे नसणे ही बाब गंभीर आहे.
महापालिका शाळांच्या एकूण 84 इमारती आहे. या इमारतीमधील 54 इमारतींना सध्या क्रीडांगण उपलब्ध आहे. तर 30 इमारतींना क्रीडांगण नसल्याचे समोर आले आहे. मैदान उपलब्ध नसल्याने मुलांना खेळाचा सराव करता येत नाही. खेळातील नैपुण्य दाखविण्यासाठी खेळाडूंना वाव मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे. एकीकडे शासन शालेय जीवनातून खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना खेळाचे मैदानच नसल्याने खेळाडू घडणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक खेळाडू विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये चांगले खेळाडू होण्याची क्षमता असूनही केवळ क्रीडांगणे नसल्याने विद्यार्थ्यांना आवड असूनही खेळाचा सराव करता येत नाही. त्यात भर पीटी शिक्षकांची कमी आहे. महापालिका शाळेतील मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध झाली तर ते नक्कीच चांगली प्रगती करतील. याचा विचार करून महापालिका शिक्षण विभागाने मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
मग हा खर्च कशासाठी ?
महापालिकेच्या तुलनेत खासगी शाळांची परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे. गल्ली-बोळांमध्ये शाळा उघडल्या आहेत. शाळा सुटल्यावर शाळांच्या समोरील रस्त्यांवर कोंडी होते. विद्यार्थी आणि पालक एकत्रितपणे उभे राहू शकतील, एवढीसुद्धा जागा शाळांच्या समोर नाही. अशा परिस्थितीत पंटागण ही तर खूप दूरची बाब आहे. असे असतानाही बहुतेक सर्व खासगी शाळा विद्यार्थ्यांना पीटीचा वेगळा गणवेश घेण्यास भाग पाडतात. आठवड्यातून एकदा तो गणवेश घालून शाळेत बोलविले जाते. जर खेळायला जागाच नाही, तर हा ड्रेस कशासाठी? अनेक शाळांमध्ये कोणतेही क्रीडा साहित्य नाही, असले तरी ते बंद कुलूपात असते, परंतु त्याच्या नावाखाली ही फी उकळली जाते. जर खेळासारखी मुलभूत सुविधा देण्यास शाळा अक्षम असतील तर हा पालकांना हा खर्च कशासाठी करायला लावता? असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे.
महापालिकेच्या शाळांना मैदाने नाहीत ही बाब खरी आहे. शहरामध्ये जागा मिळत नसल्याने शाळांना मैदाने उपलब्ध करून देण्यास अडचण येत आहे. मुलांसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी ज्या शाळांमध्ये क्रीडांगणे नाहीत अशा शाळांना पर्यायी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.
– ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिंपरी. चिंचवड महापालिका.