यान्गोन, – म्यानमारमध्ये बुधवारचा दिवस आंदोलनकाळातील आतापर्यंतचा सर्वात भीषण दिवस ठरला. लोकशाही मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सुरक्षा दलांनी कठोरपणे बळाचा वापर केला. आंदोलकांवर बेछुटपणे गोळीबार केला गेला. जमावाचा पाठलाग करून लाठीमार केला गेला आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली गेली असल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवरच्या व्हिडीओमध्ये दिसली. बुधवारी म्यानमारमध्ये तब्बल 38 जण मारले गेल्याची माहिती स्वीत्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने दिली.
एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने आंदोलकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत आंदोलनाशी संबंधित हिंसाचारामध्ये 50 पेक्षा अधिक जण ठार झाले आहेत. त्यापेक्षाही अधिकजण जखमी झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या म्यानमारमधील विशेष दूत क्रिस्टीन श्रानर बर्गनर यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पत्रकारांना सांगितले. म्यानमारमधील लोकांकडून दररोज सुमारे 2,000 मेसेजेस येत आहेत. त्यापैकी बरेच जण आंतरराष्ट्रीय समुदायाकडून लष्करी शासनावर कारवाईची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा रक्षकांकडून कठोर कारवाई केली जात असली तरी लष्करी बंड, आंग सान स्यू की यांना झालेली अटक आणि राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यासाठी म्यानमारच्या रस्त्यांवर दररोज उतरणाऱ्या आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अश्रुधुर, रबरी गोळ्यांचा मारा आणि खऱ्या गोळीबारालाही जनता आता जुमानत नाही आहे.
वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी मरण पावणाऱ्यांची संख्या 34 ते 38 च्या दरम्यान आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या आंदोलकांपैकी बहुसंख्य 18 जण यान्गोन शहरातीलच आहेत. त्याशिवाय मंडालेमध्ये 3, मागवे भागातील सलिन शहरत 2, अग्नेयेकडील मावलामयीन, मिरीग्यान आणि कलाय या भागांमध्ये प्रत्येकी एका आंदोलकाचा गोळीबारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे समजते आहे. मंडालेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावरही सुरक्षा दलांनी लाठीमार केला.
या कारवाईचा भाग म्हणून सुरक्षा दलांनी पत्रकारांसह शेकडो लोकांना अटक केली आहे. ही धरपकड आणि सामूहिक अटकसत्रामध्ये वाढ झाल्याने म्यानमारमधील राजकीय पेचप्रसंगाचे निराकरण करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही उच्चस्तरिय मुत्सदेगिरीला यश आलेले नाही.
दक्षिण आशियाई देशांच्या 10 सदस्य देशांच्या विदेश मंत्र्यांची मंगळवारी बैठक झाली. म्यानमारमधील हिंसाचार थांबवावा आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा, असे आवाहन करणारे निवेदन या संघटनेच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले. मात्र म्यानमारच्या अंतर्गत व्यवहारात संघटनेने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. म्यानमारमधील लष्करी शासनाने आतापर्यंतच्या सर्व आवाहनाकडे दुर्लक्ष करून बळाचा वापर कायम सुरू ठेवला आहे.
संयुक्त राष्ट्राची हतबलता…
संयुक्त राष्ट्राने म्यानमारमधील परिस्थितीबाबत यापूर्वीच चिंता व्यक्त केलेली आहे. मात्र अद्याप म्यानमारमधील लष्करी शासनावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. अशा कोणत्याही निर्बंधांच्या प्रस्तावाविरोधात सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असलेल्या रशिया आणि चीनकडून नकाराधिकाराचा वापर केला जाणार हे जवळपास निश्चितच समजले जात आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाची म्यानमारमधील परिस्थितीबाबत बंद कक्षामध्ये बैठक होण्याची अपेक्षा आहे. ही बैठक ब्रिटनने बोलावली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.