पश्चिम बंगाल विधासभा निवडणुक संदर्भात शिवसेनेचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूकीत तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. ही निवडणूक म्हणजे “दिदी विरुद्ध सर्वजण’ अशीच आहे. या निवडणूकीत शिवसेना सहभागी होणार नाही.

ममता बॅनर्जी म्हणजे बंगाली वाघीण आहेत. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राउत यांनी सांगितले. ममता दिदींना या निवडणूकीत यश मिळावे, अशीच आमची शुभेच्छा आहे, असे राउत यांनी आज ट्‌विटरवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच राजद नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनीही ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देऊ केला होता. मात्र बिहारमधील राजदचा मित्र पक्ष असलेली कॉंग्रेस पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांबरोबर मिळून भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस दोन्ही विरोधात निवडणूक लढवत आहे. तर समाजवादी पार्टीनेही पश्‍चिम बंगालमध्ये ममता दिदींची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला गोरखा जनमुक्‍ती मोर्चा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाठिंबा देऊ केला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाममात्र अस्तित्व आहे. पश्‍चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी 27 मार्चपासून 29 एप्रिलपर्यंत आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.