नारोवल (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात वीज अंगावर पडून किमान 11 जण ठार झाले आहेत. तर 5 जण जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत.
पंजाबची राजधानी लाहोरच्या ईशान्येकडे असलेल्या नारोवाल , सियालकोट आणि शेखुपुरा या जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टी होते आहे. त्याच जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याच्या घटना झाल्या आहेत.
रतनपूर, पंच पीर आणि चांगवली येथे वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. वीज कोसळून जखमी झालेल्यांना जिल्ह्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व पावसाने पाकिस्तानात, विशेषत: पंजाब, खैबर पख्तुनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात तडाखा दिला आहे. 26 जून ते 29 जून या कालावधीत बलुचिस्तान, दक्षिण पंजाब आणि सिंधमध्येही पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.