हडपसरमध्ये बाधित रुग्ण उपचारांविना घरीच

पालिकेचे दुर्लक्ष; सामाजिक कार्यकर्ते सुरसे यांचा आरोप

हडपसर – रुग्णांना करोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) दाखल करून न घेता पाच-पाच दिवस घरीच ठेवले जाते. तसेच, बाधिताच्या संपर्कातील नातेवाईक व नागरिकांना क्‍वारंटाइन केले जात नाही.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना उपचाराबाबत विनंती केली असता उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली जातात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार करीत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हडपसर-मुंढवा सहायक आयुक्‍त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सहायक आयुक्‍त वैभव कडलक यांनी अश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नगरसेवक मारुती तुपे, प्रशांत सुरसे यांनीही येथील अधिकारी करत असलेल्या हलगर्जीपणाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, सातववाडी-गोंधळेनगर भागात अनेक नागरिकांनी स्वतः खासगी रुग्णालय व लॅबमधून करोना टेस्ट करून घेतल्या. त्यातील अनेकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. अशा रुग्णांना पालिकेच्या करोना केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशी विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही. संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

सहायक आयुक्‍त वैभव कडलक म्हणाले की, खासगी रुग्णालये अथवा लॅबने पॉझिटिव्ह रुग्णांची यादी पालिकेकडे पाठविणे आवश्‍यक असते. मात्र, अशी यादी पाठविली जात नाही. यामुळे खासगी तपासणी केलेल्या रुग्णांची माहिती मिळत नाही. आरोग्य विभागाकडून आमच्या हद्दीतील रुग्णांची जी यादी मिळते, त्यांना तातडीने करोना केअर सेंटरमध्ये पाठविले जाते. कोविड सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या जागाही पाहिल्या जातात. प्रशासन योग्य काम करत आहे, नागरिकांनीही सहकार्य करावे.

अधिकारी, कर्मचारी तणावाखाली?
पालिकेचे अधिकारी व कर्मचारी करोना संसर्ग रोखण्यासाठी काम करत आहेत. अनेकांनी अद्याप सुट्टी घेतलेली नाही. काहींना पुरेसा आरामही नाही, यातच वारंवार होणाऱ्या आरोप आणि गैरसमजांमुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमीच तणावाखाली वावरावे लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.