बारामती -जळगाव सुपे (ता. बारामती) येथील शेतकऱ्याची सात वर्षे वयाची तीन चंदनाची झाडे सोमवारी रात्री (दि. 29) चोरून नेली आहेत. मंगळवारी (दि. 30) सकाळी शेतात गेल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील चंदनाची झाडे चोरीचे प्रकार या भागात झाले आहेत.
शेतकरी अशोक बाबूराव शेरकर यांच्या शेतातील गट क्रमांक 68 मधील चंदनाची 50 हजार रुपये किमतीची तीन झाडे चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत बुडापासून कापून नेली आहेत. हे चंदनचोर रात्री वस्तीपासून काही अंतरावर जोरात आवाज करणे किंवा काही ठिकाणी दगड मारून दहशत माजवून गावातील गावगुंडांना हाताशी धरून चोऱ्या करीत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
जळगाव सुपे हा जिरायती भाग असून, अशा प्रकारे झाडांची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त घालण्याची गरज असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.