पिंपरी – थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर एक रकमी भरल्यास 90 टक्के विलंब दंड माफ केला जाणार आहे. ही सवलत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
करोना प्रादुर्भावामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक, व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 30 जूनपर्यंत दंडाची रक्कम माफ करण्याची मुदत होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ही सवलत योजना एका महिन्यासाठी वाढविण्यात आले आहे. थकबाकीसह मूळ मिळकतकर एक रकमी भरल्यास विलंब दंडात 90 टक्के सूट दिली जाणार आहे. या सवलतीचा नागरिक व व्यावसायिकांनी लाभ घेऊन एक रकमी कर भरावा.
तसेच, अनधिकृत बांधकामधारकांकडून शास्तीकर वगळून उर्वरित मिळकतकर स्वीकारला जात आहे. करभरणा पालिकेच्या सर्व 16 कर संकलन कार्यालयात रोख, धनादेश व डीडीने स्वीकारला जात आहे. तसेच, ऑनलाइन माध्यमातून स्वीकारला जात आहे. योजनेचा लाभ घेऊन कर भरावा, असे आवाहन आयुक्तांनी केला आहे.
जूनमध्ये उत्पन्न वाढले
मे महिन्यातही शेवटच्या काही दिवसांत मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे मे महिन्यात महापालिकेला केवळ 34 कोटी 4 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. जून महिन्यामध्ये मात्र या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून या महिन्यात 102 कोटी 93 लाखांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. विशेष म्हणजे आज 30 जून रोजी एकाच दिवशी तब्बल 12 कोटी 88 लाखांचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे.