महाळुंगे इंगळे – गणेशोत्सव काळात झेंडू, अॅस्टर आदि फुलांना चांगला भाव मिळू लागल्याने ही फुले चांगलाच भाव खाऊ लागली आहेत. भोसे, रासे, आदि परिसरात सध्या झेंडू, अॅस्टर, सदाफुली ही फुले तोडण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी या फुल शेतीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
झेंडू सारख्या फुलांना गणेशोत्सव काळात समाधानकारक व योग्य भाव मिळत असतो. मात्र, गेल्या महिन्यात या परिसरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्याचे भोसे, काळूस, वडगांव घेणंद, शेलगाव आदी भागातील फूल उत्पादकांनी सांगितले.
फुलशेतीचे उत्पन्न घटल्याने बाजारात फुलांची आवक कमी होत आहे. तर अनेक उत्पादक मुंबई, पुणे, भोसरी येथील बाजारात विक्रीसाठी फुले नेण्याच्या दृष्टीने नियोजन करीत आहेत. दरम्यान, फुलांची आवक कमी होत असल्याने फुलांचे व्यापारी अगदी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुलांची मागणी करीत आहेत. सध्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
असा आहे भाव…
अॅस्टर या फुलांसाठी शेकडा 70 ते 90 रुपये जुडीकरिता व डाखळी अष्टर फुलांसाठी 70 ते 100 रुपये असा उच्चांकी भाव मिळू लागला आहे. झेंडू या फूलांसाठी 70 ते 100 रुपये प्रती किलो बाजारभाव मिळत असल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत.