* करोनानंतर पहिल्यांदाच उलाढाल वाढली
* समाधानकारक आवक, मागणीही जास्त
* भाव मिळत असल्याने शेतकरीही समाधानी
पुणे – करोनानंतर यंदा निर्बंधमुक्त होणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. करोनानंतर पहिल्यांदाच मार्केट यार्डातील फूलबाजार पूर्वीप्रमाणे बहरला आहे. फुलांची आवक वाढली आहे. मागील आठवड्याचा विचार केल्यास आवक दुप्पटीने वाढली आहे. त्या तुलनेत गणपती मंडळे, घरगुती गणराया-गौरीच्या स्वागतासाठी फुलांना मागणी जास्त आहे. परिणामी, मागील आठवड्याच्या तुलनेत भावातही दुप्पट वाढ झाल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
करोनाचा सर्वाधिक फटका मार्केट यार्डातील फुलाच्या विक्रीवर झाला होता. मंदिर बंद असल्याने तसेच दैनंदिन गरजेची वस्तु नसल्याचा ठेपका ठेवत बाजार समितीने कित्येक दिवस हा बाजार बंद ठेवला होता. परिणामी, शेतकऱ्यांनी फुलांची लागवड कमी केली होती.
त्यामुळे फूलबाजार सुरू झाल्यानंतर मार्केट यार्डात फुलांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी होत होती.
मागील गणेशोत्सवाच्या काळात आवक वाढली होती. मात्र, नेहमी होणाऱ्या गणेशोत्सवाचा विचार केल्यास ही आवक कमी होती. पण, यंदा आवक आणि मागणी समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
करोनानंतर पहिल्यांदाच मार्केट यार्डातील फूलबाजारात पूर्वीप्रमाणे भरपूर आवक झाली आहे. बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी राखून ठेवलेला माल बाजारात आणला आहे. तुलनेने भाव जास्त मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. गौरी विसर्जनापर्यंत फुलांना जास्त मागणी राहणार आहे. फुलांचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.
सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड.