सातारा – राज्यासह देशभरात उद्या (मंगळवारी) विजयादशमी अर्थात दसरा सण साजरा होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही सध्या खरेदीची लगबग सुरू आहे. दसरा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दिवाळीनिमित्त व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये ऑफर जाहीर झाल्या आहेत. वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रालंकार, सोने- चांदी खरेदी तसेच गृहप्रकल्प व्यवसायामध्ये तेजीचे वातावरण आहे. याशिवाय रविवार- सोमवारी झेंडूसह विविध फुले बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्याने, रस्त्याकडेला बसलेल्या विक्रेत्यांपुढील लाल- पिवळ्या झेंडूंनी शाहूनगरी अक्षरश: बहरुन गेली. खरेदीसाठी महिला व नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, शाही दसरा साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही जोरदार तयारी केली असून राजवाडा ते पोवई नाका अशी शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त साताऱ्याची बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर शहर परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. सोमवारी झेंडूची फुले विकण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती. सुमारे 40 ते 50 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली.
या फुलांना ग्राहकांमधून चांगली मागणी असल्याची शेतकऱ्यांनी सांगितले. पोवई नाका, मोती चौक, राजवाडा, खण आळी, गोलबाग, सदाशिव पेठ, एसटी स्टॅंड परिसर, भूविकास बॅंक चौक ते करंजे, तामजाईनगर, शाहूपुरी, गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट, भाजी मंडई परिसर, समर्थ मंदिर येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पिवळ्या व लाल झेंडूची फुले, आपट्याची पाने विक्रीसाठी आली होती.
यंदा बाजारपेठेत वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी याशिवाय कापड खरेदी, सराफ कट्टा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण आहे. साताऱ्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन गृहप्रकल्प दिमाखात सादर होत असून यावर आकर्षक योजना जाहीर केल्या जात आहेत. दसऱ्यानिमित्त वाहन क्षेत्रांमध्ये काही अधिकृत विक्रेत्यांनी एकावेळी 50 ते 60 गाड्यांच्या वितरणाचे समारंभ आयोजले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे सातारकर सध्या खरेदीच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. साताऱ्याचा शाही दसरा साजरा करण्यासाठी जलमंदिरमध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांकडून शाही दसऱ्याची तयारी केली जात आहे.
झेंडू बहरला, शेतकरी आनंदला
राज्यात यंदा पावसाने कमालीची ओढ दिली. राज्याच्या विविध भागात हा पाऊस असमानतेने पडला. कुठे प्रमाणापेक्षा अधिक तर कुठे अत्यल्पच. पण, अशा स्थितीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल झेंडूच्या फूलशेतीकडे राहिला. अनेकांनी त्याची लागवड केली आणि त्यास पोषक असे वातावरण मिळाल्याने यंदा झेंडूचे उत्पादनही चांगले झाले. मालाचा दर्जा आणि दरही चांगला राहिल्याने, झेंडू बहरला… शेतकरी आनंदला… असेच काहीसे वातावरण बाजारपेठेत दिसत होते.
शाही मिरवणुकीची उत्सुकता
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही शिवकाळाची आठवण करून देणारी भव्य मिरवणूक दसऱ्यानिमित्त करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गांधी मैदानावर या दसऱ्याची मिरवणूक आणि त्याची तयारी दिसून येत होती. विजयादशमीच्या निमित्ताने सायंकाळी साडेपाच वाजता ही मिरवणूक निघणार आहे. उंट, हत्ती, घोडे, पारंपारिक वेशभूषेतील मावळे असे शिवकाळाचे वातावरण दिसून येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पारंपारिक शस्त्रांचे येथील पोवई नाक्यावर पूजन केले जाणार आहे. या शाही मिरवणुकीची सातारकरांना आवर्जून प्रतीक्षा आहे.