Assembly Election Result 2023 : देशातील चार राज्य म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, या चार राज्यांच्या सुरुवातीच्या कलामध्ये तीन राज्यात भाजपने आघाडी मिळवली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे आतापर्यंतच्या कलांवरून दिसून येत आहे. सकाळी मतमोजणीपूर्वी काँग्रेसकडून दिल्ली आणि भोपाळमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, आता समोर येत असलेले कल पक्षाच्या विरोधात जात असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, तीन राज्यात आघाडी मिळाल्यानंतर आता भाजपने सुद्धा जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जयपूरमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. त्यातच आता संध्याकाळी ५ वाजता भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी जनतेते आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. आतापर्यंतच्या कलानुसार १६१ जागांवर भाजपची आघाडी असून राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत कलानुसार ११२ जागांवर भाजपची मुसंडी पाहायला मिळत आहे.
छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. परंतु आता याठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. याठिकाणी भाजप ५४ जागांवर आघाडीवर असून सुरूवातीच्या कलामध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसून आली. याचबरोबर, तेलंगणात विधानसभेसाठी 199 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसला ६५ जागांवर आघाडी मिळाली असून बीआरएसला केवळ ३८ जागांवर आघाडी मिळतानादिसून येत आहे.