Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेशात सध्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्ष 160 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात शिवराज सिंह चौहान हेच मुख्यमंत्री असतील असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा भाजपचे मुख्यमंत्री झाले तर ते आपल्याच पक्षातील अनेक नेत्यांचे रेकॉर्ड मोडतील.
विशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या लाडली बहना योजनेचं यश म्हणून हे निवडणूक निकाल समोर येत असल्याचे म्हटल जात आहे. या योजनेचा शिवराज यांना आणि भाजपाला येथे फायदा झाल्याचे पहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पिछाडीवर पडलेल्या भाजपला या योजनेचा मोठा फायदा झाला आणि भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवर येईल असे चित्र समोर येत आहे, त्यामुळे पक्ष आता मुख्यमंत्री चेहरा बदलण्याबाबत बोलणार नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आणि पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान हेच मुख्यमंत्री दिसतील.
आता कोण आहे कुठून आघाडीवर जाणून घ्या संपूर्ण अपडेट…
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार शिवराज सिंह चौहान बुधनीमधून 29 हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. छिंदवाडामधून काँग्रेसचे कमलनाथ पाच हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. दिमानी येथील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर 3085 मतांनी पुढे आहेत.
आकडेवारीनुसार, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार प्रल्हाद पटेल हे नरसिंगपूरमधून 4145 हजार मतांनी पुढे आहेत. निवास येथील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते 9597 मतांनी मागे आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, 25 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांवर मतदान झाले होते. मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. मध्य प्रदेशात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. यावेळी राज्यातील 230 जागांवर 76.62 टक्के मतदान झाले असून, हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
दरम्यान, 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2018 मध्ये काँग्रेसने राज्यात 114 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ यांचे सरकार पडले.