Election Results 2023 – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मात्र, त्या चार राज्यांत मुख्यमंत्री कोण? बनणार याविषयीचा सस्पेन्स अद्यापही कायम राहिला आहे. मतदारांनी स्पष्ट कौल देताना तेलंगणाची सत्ता कॉंग्रेसकडे, तर इतर तिन्ही राज्यांची सत्ता भाजपकडे सोपवली. आता त्या राज्यांत स्पष्ट बहुमत असणाऱ्या सरकारांची सत्ता स्थापना होईल. मात्र, दोन्ही पक्षांनी संभाव्य मुख्यमंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत.
त्यामुळे ते पक्ष मुख्यमंत्री निवडताना काही वेगळे प्रयोग करणार का याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांची निवड लांबली तर तर्क-वितर्कांना उधाण येईल. त्यातून नेतृत्वाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांविषयीच्या चर्चाही रंगतील. तेलंगणात सरकार स्थापनेसाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची नुकतीच बैठक झाली असून, त्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र, तसे घडले नाही. मुख्यमंत्री निवडीचे सर्वांधिकार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे रेड्डी यांच्याशिवाय इतर नावांवरही कॉंग्रेस श्रेष्ठी विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहे. तर, दुसरीकडे भाजप पक्षश्रेष्ठींनी तिन्ही राज्यांतील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून भावी मुख्यमंत्रिपदाबाबत खलबते केली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अनेक नावे समोर असल्याचं पाहायला मिळत आहे.
– राजस्थान
वसुंधराराजे : वसुंधराराजे यांनी पूर्वी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.
दियाकुमारी : राजघराण्याशी संबंधित असलेल्या दियाकुमारी यांनी तब्बल ७१ हजार मताधिक्याने विजय संपादन केला आहे. वसुंधराराजे यांना पर्यायी म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे.
महंत बालकनाथ : बालकनाथ हे खासदार आहेत. त्यांनी तिजारी येथून विजय प्राप्त केला आहे. ते नाथ संप्रदायाचे आठवे मुख्य महंत आहेत, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राजस्थानात त्यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्तकरण्याच्या हालचाली सुरू आहेत.
– छत्तीसगड
डॉ. रमणसिंह : माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे नाहीत. रमणसिंह यांच्याशिवाय सरोज पांडे, बृजमोहन अग्रवाल, ओपी चौधरी, लता उसेंडी यांच्या नावाचीही चर्चा आहे.
अरुण साव : छत्तीसगडमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी अरुण साव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
रेणुका सिंह : सिंह या केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहे. त्या आदिवासी समुदायातील आहेत.
– मध्यप्रदेश
शिवराजसिंह चौहान : मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजनेतून सत्ता खेचली असली तरी त्यांची पुन्हा वर्णी लागण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही चर्चा आहे. शिंदे काँग्रेसमधून भाजपत आले आहेत. त्यांना संधी दिल्यास अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता आहे.
नरेंद्रसिंह तोमर : केंद्रीय मंत्री असलेले तोमर यांच्या समर्थकांकडूनही मुख्यमंत्रिपदावर प्रबळ दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे. निकालानंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनीदिल्लीला बोलावले आहे.