पुणे :– भारताच्या सुकांत कदमला चीनमध्ये हांगझू येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन ब्रॉंझपदकांवर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील एसएल 4 गटातील उपांत्य लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या तिसऱ्या मानांकित सुकांतला मलेशियाच्या मोहम्मद अमीन बुऱ्हानुद्दिन कडून 21-23, 21-11 असा पराभव पत्करावा लागला.
बिगरमानांकित बुऱ्हानुद्दिनने ही लढत 34 मिनिटांत जिंकली. त्यापूर्वी सुकांतने दक्षिण कोरियाच्या शिन क्युंग ह्यूनचा 57 मिनिटांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर 12-21, 21-17, 22-20 असा पराभव केला. त्यानंतर एसएल 3 आणि 4 गटातील दुहेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सुकांत-प्रमोद भगत या भारतीय जोडीला सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला.
इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित द्वियोको द्वियोको-फ्रेडी सेटियान जोडीने भारतीय जोडीवर 22-20, 21-23, 12-21 असा विजय मिळविला. पहिला गेम संघर्षपूर्ण खेळ करून मिळविल्यावर दुसरा गेम असाच भारताने गमावला. तिसऱ्या गेमला मात्र त्यांना सातत्य राखता आले नाही.
It is a 🥉for @sukant9993 in #AsianParaGames2022
India’s medal count keeps rising as Sukant Kadam secures the Bronze in Men’s Badminton Singles SL-4 with an outstanding performance.🏸🌟
Congratulations, Champ! Your achievement is truly commendable. 🏆💪#AsianParaGames… pic.twitter.com/TSY1QrnLdQ
— SAI Media (@Media_SAI) October 26, 2023
पुणेस्थित 30 वर्षीय सुकांतने हांगझू येथे प्रथमच वैयक्तिक प्रकारात दोन ब्रॉंझपदकांची कमाई केली. यापूर्वी सुकांत दोन पॅरा आशियाई स्पर्धेत खेळला आहे. इंडोनेशिया येथे झालेल्या जकार्ता 2018 पॅरा आशियाई स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचा सुकांत सदस्य होता.