नवी दिल्ली – महाराष्ट्राचा अव्वल कुस्तीपटू आतिष तोडकर याने ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पियन कुस्तीपटू रवी दहिया याला आस्मान दाखवले. या सनसनाटी पराभवामुळे दहियाचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंग झाले.
रविवारी पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये हा सर्वात मोठा व धक्कादायक निकाल ठरला. ऑलिम्पिक रजतपदक विजेता स्टार कुस्तीपटू रवी दहिया याला 57 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या आतिश तोडकरने पराभूत केले.
रवी दहिया नुकताच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर प्रशिक्षकांविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याला आतिशने 57 किलो वजनी गटात 20-8 अशी आघाडी घेत पराभूत केले. दहिया याचा हा पराभव खूप मोठा अपसेट मानला जात आहे.
उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे रवी दहियाने यंदाच्या मोसमात कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला अद्याप पदक जिंकता आलेले नाही व हीच नकोषी परंपरा यंदाही कायम राहणार आहे.
त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक पटकावले होते. 2019 सालच्या जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते. 2022 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही पटकावले होते. त्यामुळेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो पदकासाठी सज्ज बनला होता. मात्र, आतिषकडून पराभव झाल्याने त्याचे स्वप्न भंग झाले.