आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा – गोमती आणि ताजिंदर सिंगचे सोनेरी यश

दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकांची भर

दोहा  – आशियाई ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाच पदकांची भर घातली असून भारताची ऍथलीट गोमती मरिमुथू हिने अनपेक्षित कामगिरी करत महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी यश संपादन केले. तर, गोळाफेकपटू ताजिंदरसिंग तूर यानेही सुवर्णपदकाची कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

30 वर्षीय गोमतीने आपली सर्वोत्तम वेळ नोंदवताना 2 मिनिटे 02.70 सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. राष्ट्रीय विक्रमवीर ताजिंदरने अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नांत 20.22 मीटर गोळाफेक करत सुवर्णपदकावर कब्जा केला. 24 वर्षीय ताजिंदरने 20.75 अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

तर, भारताच्या शिवपाल सिंग याने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शिवपालने 86.23 मीटर अशी कामगिरी करत सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये याच मैदानावर होणाऱ्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतील आपले स्थान निश्‍चित केले. जबीर मदारी पल्लियाली आणि सरिताबेन गायकवाड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले. सरिताबेन हिने 57.22 सेंकद अशी वेळ देत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. याच गटात व्हिएतनामच्या कुआच थे लान (56.10 सेकंद) आणि बहारिनच्या अमिनात युसूफ जमाल (56.39) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक प्राप्त केले होते.

पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत गतविजेता मोहम्मद अनास आणि गेल्या वेळचा रौप्यपदक विजेता अरोकिया राजीव यांना पदक मिळवण्यात अपयश आले. राजीवला 45.37 सेकंद अशा कामगिरीसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी पायाला झालेल्या दुखापतीमुळे अनासला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 46.10 सेकंदासह आठवा क्रमांक प्राप्त केला.

तर, भारताचा बॉक्‍सर कविंद्र सिंग बिश्‍त याने (56 किलो) जगज्जेत्या कैराट येरालियेव्ह याला पराभवाचा धक्का देत आशियाई बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली तर, अमित पांघल यानेही (52 किलो) ऑलिम्पिक विजेत्या हसनबॉय दुसमाटोव्ह चा पराभव करत आगेकूच केली.

कविंद्र सिंगने अटीतटीच्या रंगलेल्या लढतीत कझाकस्तानच्या येरालियेव्ह याला 3-2 असे पराभूत केले. जीबी बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या उत्तराखंडच्या कविंद्रने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीत सातत्य राखत किमान कांस्यपदक निश्‍चित केले आहे. रोहतकच्या अमितने आशियाई स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दुसमाटोव्हला 4-1 असे सहज पराभूत केले. अमितचा हा दुसमाटोव्हवरील सलग दुसरा विजय ठरला.

तर, महिलांमध्ये, जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या हरयाणाच्या 21 वर्षीय सोनिया चहलने (57 किलो) आपला सामना सहज जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सोनियाने शांत, संयमी खेळ आणि परिपक्वतेचे दर्शन घडवत कोरियाच्या जो सोन वा हिच्यावर 3-2 असा सनसनाटी विजय मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.