आशियाई ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धा : स्वप्ना बर्मन, शिवा थापा आणि सरिता देवी यांची प्रभावी कामगिरी

दोहा – येथे होत असलेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स आणि बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि गतविजेत्या स्वप्ना बर्मनने रौप्य पदकाची कमाई केली असून बॉक्‍सर्स शिवा थापा आणि सरिता देवीयांनी प्रभावी कामगिरी करत स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारत आपले पदक निश्‍चीत केले आहे.

यावेळी स्वप्ना बर्मन हिला आशियाई ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. मात्र पदकासाठीचा दावेदार समजल्या जाणाऱ्या जिन्सन जॉन्सनने दुखापतीमुळे पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.

22 वर्षीय स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये 5993 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. तिच्यावर उझबेकिस्तानच्या एकतारिना वोरनिना हिने 6198 गुण मिळवत मात केली. याच गटात भारताच्या पूर्णिमा हेमब्राम हिला 5528 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्वप्नाच्या रौप्यपदकामुळे भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.

तर, महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरी हिने 10.03.43 सेकंद अशी वेळ देत पाचवे स्थान प्राप्त केले. मंगळवारी सुरुवातीलाच भारताला जॉन्सनच्या रूपाने पहिला धक्का बसला. पहिल्या फेरीतच त्याला दुखापत झाल्याने स्पर्धेबाहेर जावे लागले. “”जॉन्सनच्या डाव्या पायाच्या मांडीचे स्नातू ताणले गेले आहोत. डॉक्‍टरांनी त्याला सद्यपरिस्थितीत सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे,” असे भारताचे उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले.

तर, आशियाई बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत शिवा थापा (60 किलो) याने थायलंडच्या रुजाक्रण जुनट्रॉंग याच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सलग चौथ्यांदा त्याने या स्पर्धेत आपले पदक निश्‍चित केले आहे. एल. सरिता देवी हिनेही दशकभरात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठत सुवर्णपदकाच्या दिशेने कूच केली आहे. यावेळी 25 वर्षीय शिवाने एकतर्फी रंगलेल्या या सामन्यात जुनट्रॉंग याचा 5-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. त्याला आता 2015च्या रौप्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या झाकीर शैफीउल्लिन याच्याशी लढत द्यावी लागेल.

शिवाने 2013मध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर 2015मध्ये कांस्य तर 2017मध्ये रौप्यपदक पटकावले होते. शिवाच्या सर्वागसुंदर खेळासमोर जुनट्रॉंग याची कोणतीही मात्रा चालली नाही. तांत्रिकदृष्टया वरचढ असलेल्या शिवाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबत जोरदार ठोसे लगावले. त्यामुळे जुनट्रॉंगसमोर हार पत्करण्यावाचून कोणताही पर्याय नव्हता.

आशीष कुमार (75 किलो) याने किर्गिजिस्तानच्या ओमेरबेक उलू बेहझाइट याला एकतर्फी लढतीत हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक पटकावणाऱ्या नमन तनवार (91 किलो) याला मात्र उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याला जॉर्डनच्या हुसेन इशाईशने 0-5 असे पराभूत केले.

महिलांमध्ये, माजी जगज्जेती सरिता देवी हिने 2010मध्ये आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर आता कझाकस्तानच्या रिमा वोलोस्सेंको हिला पराभूत करत अंतिम चार जणींमध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रौप्यपदक विजेत्या मनीषा हिने फिलिपिन्सच्या पेटेसियो झा नाइस हिला हरवत किमान कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.