कोलंबो :- भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आशिया करंडकाच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर होणाऱ्या सुपर-4 सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
के.एल. राहुलने कोलंबो गाठत फलंदाजी सराव सुरु केल्यानंतर संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन संघ सोडून भारतात परतला आहे. राहुलच्या फिटनेसबाबत संघ व्यवस्थापनाला शंका होती, त्यामुळे सॅमसनला राखीव म्हणून आशिया करंडकाच्या संघात स्थान देण्यात आले होते.
त्यामुळे राहुलची संघात एंट्री झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून सॅमसनला माघारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान राहुल महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीचा सामना करण्यासाठी डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध सराव करताना दिसला.
दोन्ही संघ Playing 11चे संभाव्य खेळाङू :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान (उपकर्णधार), इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ.
सॅमसनला वगळल्याने टीका…
दरम्यान,एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाल्यावर लगेचच चाहत्यांनी त्यावर आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी केल्यावरही संजू सॅमसनला सातत्याने संघातून वगळले जात आहे. लोकेश राहुल चार महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले असले तरीही त्यापूर्वीची त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. मात्र, केवळ बीसीसीआयच्या नियमानुसार एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असेल तर तंदुरुस्त ठरल्यावर त्यालाच प्राधान्य दिले जाते, या निकषावरही चाहत्यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.