मुंबई :- बहुप्रतिक्षित आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अखेर बुधवारी जाहीर करण्यात आले. 30 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील लक्षवेधी लढत 2 सप्टेंबरला होणार आहे.
स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानकडे असले तरीही श्रीलंकेत सर्वाधिक सामने होणार आहेत. या स्पर्धेत सलामीची लढत यजमान पाकिस्तान व नेपाळ यांच्यात होणार असून हा सामना मुलतानमध्ये 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
स्पर्धेतील दुसरा सामना 31 ऑगस्ट रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे बांगलादेश व श्रीलंका यांच्यात होणार आहे. अ व ब गटातील अव्वल संघ सुपर चारमध्ये पात्र ठरतील.
अ गटात भारत, पाकिस्तान व नेपाळचे संघ असून ब गटात श्रीलंका, अफगाणीस्तान व बांगलादेश संघ आहेत. या दोन्ही गटातून अव्वल दोन संघ सुपर चार गटासाठी पात्र होतील.