अशोक गेहलोत: फादर ऑफ इंडिया या उल्लेखावर आक्षेप
जयपूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील एका कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया म्हणून केला. महात्मा गांधी यांच्याविषयी आदर असेल तर मोदींनी त्यावेळी ट्रम्प यांना रोखले का नाही, असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी केला.
येथे पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदींविषयी केलेल्या उल्लेखावर मी आक्षेप नोंदवू इच्छितो.
त्यावेळी मोदींनी मौन का बाळगले? मोदींनी ट्रम्प यांची चूक दुरूस्त करायला हवी होती. महात्मा गांधी हे भारताचे एकमेव राष्ट्रपिता आहेत. ती जागा कुणी घेऊ शकत नाही, असे मोदींनी त्यावेळी सांगायला हवे होते, अशी पुस्तीही गेहलोत यांनी जोडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने 70 वर्षे महात्मा गांधींना महत्व दिले नाही. मात्र, आता संघ, भाजपबरोबरच मोदी त्यांचे नाव घेऊ लागले आहेत. महात्मा गांधी यांचे विराट व्यक्तिमत्व समजू न शकल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही गेहलोत यांनी केली.