अशोक चव्हाणांची नांदेडमध्ये एकाकी झुंज

गेल्या वेळी मोदी लाटेतही कॉंग्रेसने नांदेडमध्ये आपला बुरूज राखला होता. यंदा या मतदार संघात दि.18 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, नांदेडमध्ये कॉंग्रेस प्रचारात एकाकी पडलेली दिसत आहे. कारण, कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा अशोक चव्हाण एकटे सांभाळत असल्याचे चित्र आहे. प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुतांश स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये सध्यातरी कॉंग्रेसची निवडणूक “अशोक चव्हाण प्रायव्हेट लिमिटेड’ ठरत असल्याचे चित्र असून राज ठाकरे यांच्या सभेने फार काही चित्र बदलेल, अशी परिस्थिती नसल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटना-शेतकरी कामगार पक्ष-युनायटेड जनता दल-पीपल्स रिपब्लिकन पार्टी या प्रमुख पक्षांची महाआघाडी लोकसभेसाठी मैदानात आहे. मात्र, नांदेडमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण रिंगणात असूनही महाआघाडीचे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ सोडले, तर अजून कोणीही चव्हाण यांच्या प्रचाराला आलेले नाहीत. त्यातच प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

मागील काही वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याविरुद्ध आंदोलन केले आहे. तर, राज्य पातळीवर या महाआघाडीत खुद्द राजू शेट्टी सामील झाले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी “स्वाभिमाना’चे अस्त्र काढत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कोणाचीही सोबत नसल्याने चव्हाण एकाकी पडले असल्याचे चित्र असून वंचित बहुजन आघाडीच्या मागे जनाधार वाढत आहे. तळपत्या उन्हात लोक प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.

अनेक भीम जयंती उत्सव मंडळांनी यंदा आपले कार्यक्रम रद्द करत जमा झालेला निधी वंचित बहुजन आघाडीला दिला. त्यामुळे आर्थिक पाठबळही मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांचेही नांदेडमध्ये नियोजन केले जात आहे. आता मतदानाचा दिवस जवळ आला असताना कॉंग्रेसचा एकही मोठा नेता नांदेडकडे फिरकला नसल्याने मतदारसंघाचा अंदाज लावणे मतदारांनाच अडचणीचे जात आहे.

दुसरीकडे भाजपही यावेळी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली असली, तरी त्यातही बाहेरचा आणि स्थानिक अशा चर्चा असून प्रतापराव चिखलीकरांना शहरी भागातून काही प्रमाणात प्रतिकूल वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)