पुणे (प्रभात वृत्तसेवा) – दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी ऍड. दादाभाऊ शेटे यांची, तर, उपध्यक्षपदी ऍड. विजयराव आढाव यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, सचिवपदी ऍड. निवेदीता काळे यांची फेरनिवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सहायक सहकारी अधिकारी संस्था संजय खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ऍड. शेटे हे नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहेत.
एलएलबी शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी वकिलांच्या हाताखाली टायपरायटींगचे काम केले. सिनियर ऍड. विनायक करकंडे आणि ऍड. तुषार कोठावळे यांच्याकडून त्यांना सहकार्य मिळाले.
त्यांनी यापूर्वी सहसचिव आणि सचिव म्हणून सोसायटीत काम केले आहे. राज्यातील वकिलांची ही सर्वात मोठी सोसायटी आहे. सुमारे सात हजार 800 वकील सोसायटीचे सभासद आहेत.
न्यायालयीन कामकाजासाठी लागणारी स्टेशनरी, स्टॅम्प पेपर, ई-चलन, लिव्ह अँड लायसन्सचा पुरवठा सोसायटीकडून नियमितपणे केला जातो.