हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – आई हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.एखाद संकट उभं ठाकल किंवा अचानक पायाला ठेच लागली तर आपसूक नकळत आपल्या ओठातून एकच नाव येते ते म्हणजे आई.आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाने ही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. आईच्या मृत्यूनंतर काही वेळाने मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेने गावावर एकच शोककळा पसरली तर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात असलेल्या पांगरा बोखारे गावामध्ये ही दुःखद घटना घडली . या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.पांगरा बोखारे येथील समिंदराबाई नामदेवराव बोखारे यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. परंतु आईच्या निधनाची बातमी समजल्यानंतर 65 वर्षीय मुलगा विश्वनाथ नामदेव बोखारे याचाही काही वेळाच्या अंतराने मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच वसमत तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली.आई व मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने संपूर्ण गाव शोकाकुल झाले. विश्वनाथ बोखारे यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.