पुणे – ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून त्याने रुग्णालयातून पळ काढला होता. मागील 15 दिवसांपासून फरार असलेल्या ललित शोधण्यासाठी पोलिस अथक प्रयत्न करत होते. अखेर त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चेन्नईतून अटक केली आहे.
मात्र मागील काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरणावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहे. यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सुषमा अंधारे यांनी “अखेर ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन… पण…” असे पोस्टमध्ये म्हंटले आहे. पुढे त्यांनी काहीही स्पष्ट न केल्याने अनेकजण यावर प्रश्न विचारत आहे. दरम्यान, ललित पाटील सापडल्यानंतर त्याच्या चौकशीत आणखी कोणते नवे खुलासे होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
यापूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पहिल्यांदा पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांने ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांच्यावरच आरोप करत त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली होती.
सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर दादा भुसे काय म्हणाले होते?
यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर हा आरोप केला आहे. त्यांच्याकडे पुरावे किंवा ठोस माहिती नाही, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्ड चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखे आहे, असे दादा भुसे म्हणाले होते.