मुंबई : राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मचे एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले.
लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात लस घेणे सक्तीचे नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणं त्यांना भाग पाडू, असे सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.