पुणे – अधिक व्याजाचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्यानंतर त्याचा परतावा देण्यात टाळाटाळ केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांच्या विरोधात बुधवारपर्यंत 35 जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे ही देय रक्कम काही कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, सुरुवातीला दाखल झालेल्या चार गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखाच करणार असल्याची माहिती पोलीस दलातील विश्वासार्ह सूत्रांनी बुधवारी दिली.
लुंकड यांना आर्थिक फसवणुकीच्या आरोपांवरून येरवडा पोलिसांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अटक केली होती. त्यांना मंगळवारी न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी तक्रारदारांचा ओघ सुरू झाला. मंगळवारी दिवसभरात 23 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग केल्यानंतर बुधवारी 13 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या 12 गुंतवणूकदारांनी तक्रारी आल्या असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.
सुरुवातीला गुन्हे शाखेत तक्रार देणाऱ्या चार प्रकरणात 76 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरेयांनी सांगितले. यापूर्वी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके प्रकरणात 32 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची तीन हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.
त्या धर्तीवर गुंतवणूकदारांची फसवणूक होणार असल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. तक्रार करण्यास येणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्तहोत असून, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्तीही वाढणार आहे. संजय विलास होनराव (वय 48 , रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना अटक करण्यात आली.
फिर्यादीनुसार, या फर्मच्या कल्याणीनगर येथील स्कॉय वन बिल्डिंगमधील कार्यालयात होनराव यांनी अमित लुंकड यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी होनराव यांना गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना 15 टक्केव्याज देण्याचे प्रलोभन दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून लुंकड रिऍलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये 21 लाख 26 हजार 875 रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
मात्र, व्याज न देता लुंकड यांनी फसवणूक केल्याची फिर्याद होनराव यांनी पोलिसात दिली. दरम्यान, यानंतर गुंतवणूकदारांना तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये किती रकमेची फसवणूक झाली, याचे गणित पोलिसांकडून लावण्यात येत आहे.
गुंतवणूकदारांना गुंडाळण्याचा प्रयत्न
गुंतवणूकदार तक्रार करण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे बुधवारी मोठ्या संख्येने येत होते. त्यावेळी त्यांची समजूत घालण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत होते. काहींना कल्याणीनगर येथील कार्यालयात नेऊन काही प्रमाणात रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम देण्यासाठी डिसेंबरपर्यंत अथवा काही महिने थांबण्याची विनंती करण्यात येत असल्याची माहिती काही गुंतवणूकदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.