पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हे शखेच्या पोलिसंनी अटक केलेले बांधकाम व्यावसायिक अमित कांतिलाल लुंकड यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी जामीन मंजुर केला आहे.
ज्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीची मुदत संपली आहे. ज्या गुंतवणूकदारांना मुदत न संपताही पैसे परत पाहिजे आहेत, त्यांना आठ दिवसाच्या आत पैसे देण्याबाबत बचाव पक्षाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार हा जामीन देण्यात आलेला आहे. जर गुंतवणूकदारांनी मागणी केल्यानंतर 15 दिवसात रक्कम न दिल्यास वकिलांनी माहिती दिलेली संपत्ती विकून रक्कम दिली जाईल. त्यामध्ये त्यांचे कुटुंबिय अडथला आणू शकणार नाहीत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. जितेंद्र सावंत आणि ऍड. राहुल भरेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. संजय विलास होनराव (वय 48 , रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लुंकड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे 38 गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत.
होनराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुंतविलेल्या रक्कमेवर प्रतिमहिना 15 टक्के परतावा देऊ, असे प्रलोभन दाखविण्यात आले. त्यानुसार विश्वास ठेवत फिर्यादींनी लुंकड रिऍलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी भरुन 21 लाख 26 हजार 875 रुपयांची गुंतवणुक केली.
त्यावर ठरल्याप्रमाणे परतावा न देता फिर्यादींची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. यामध्ये बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. जितेंद्र सावंत आणि ऍड. राहुल भरेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला. फिर्यादी आणि तक्रारी दिलेल्या चार गुंतवणूकदारांना त्याच दिवशी आरटीजीसद्वारे रक्कम परत देण्यात आली आहे.
इतर गुंतवणूकदारांनी पैसे मागितल्यास द्यायला तयार आहोत. त्यासाठी न्यायालयाने वेळ द्यावा. तीस वर्षांपासून ही फर्म अस्तित्वात आहे. त्यामध्ये एकही फौजदारी अथवा धनादेश बाऊन्सची तक्रार झालेली नाही, याचा विचार करून जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.